Wednesday 26 December 2018

या दैवा या नशीबा


जेव्हापासून मनुष्य समाज अस्तित्वात आला दैव,भाग्य आलंच तसेच सुदैव आणि दुर्दैव हेही आलंच. काही चांगलं झालं आयुष्यात तर ते सुदैव म्हटले जाते आणि वाईट घडलं तर दुर्दैव पण खरचं हे दैव सुदैव दुर्दैव असतं का हो? कि हाताच्या रेषांपेक्षा हाताने केलेलं प्रत्यक्ष काम च भविष्य ठरवत असतं? बरेच लोक असं म्हणतात दैवावर विश्वास ठेवून काय होते काही ठिकाणी प्रत्यक्ष देव च होऊन बदल घडवावा लागतो मग तो आत्मिक असो अथवा सामाजिक ! 


म्हणजे दैव आपल्या हातात असतं का हो? कि ते अदृश्य असतं येणाऱ्या प्रत्येक क्षणातून व्यक्त होणारं असतं. हा शब्द सुद्धा देव या शब्दापासून आलाय म्हणजे कोणीही न पाहिलेला पण असलेला तो राघव तो मयुरेश तो हरी आलाच इथे मग त्यासोबत पाप पुण्य सुद्धा आलंच कि.
शेवटी माणसाचं कर्तृत्व हेच येणार काळ सुदैवी कि दुर्दैवी याचा निकाल देत असतं पण कधी यापेक्षा भिन्न देखील घडत असतं जे अथक प्रयत्न करूनही प्राप्त होत नाही. तिथे मग दैव आड आलं असं म्हणतो आपण नाहीतर कधी काही जमलं नाही तर दैवावर सोडून द्या असेही म्हणतो. आणि एक मस्त म्हण आहे "या दैवा या नशीबा" पण यातलं नेमकं सत्य काय याचा सांगोवा घ्यायचं ठरवलं तर हाती काही मिळेल का कि हि गुंतागुंत वाढतच जाईल ? तरीही आज ठरवलचं काहीतरी निष्कर्ष काढायचा याचा!
एक खरे उदाहरण घेतो . एखाद्या मुलाला परीक्षेत पुढचा मुलगा हुशार असला तर चांगले मार्क येतात तर एखाद्याला स्वतः खूप अभ्यास करूनही स्वबळावर लढुनही तेवढे मार्क मिळत नाही.


मग यात कर्तृत्व हरते आणि दैव जिंकते आणि जो जिंकतो त्यासाठी ते सुदैव ठरते पण अभ्यास करूनही यश न मिळणारा मात्र दुर्दैवाचा बळी ठरतो.
आता आपली मुंबई च बघा ना छत्रपतींच्या काळापासून आपली आहे पण 1960 ला ती महाराष्ट्राला मिळूच नये असे घाट बांधले गेले पण आपण जिंकली मुंबई पण तरीही भरपूर संख्येत असलेले गुजराती जमिनी व आर्थिक साम्राज्यवाद सोडायला तयार नाही.गेल्या 70 वर्षात कोट्यवधी उत्तर भारतीय व अन्य राज्यातून लोक आले पण तरीही मुंबई मराठी माणसांनी राखली अगदी 2017 च्या लहरीत सुद्धा  हे आमचं कर्तृत्व च म्हणावं  लागेल.पण आमचेच लोक तिथल्या गुजराती व उत्तरीय लोकांना भडकवून आमच्याच हातातून आमचं राज्य जावं असा प्रयत्न करतात हे ह्या सह्याद्रीचं किती मोठं दुर्दैव ! 



ज्या मुंबई ने   सर्व जातभाषिय धार्मिय लोकांना करोडो च्या संख्येत स्थान दिलं त्यांनी मात्र मुंबई या काय दिलं? भाषेच्या आधारावरील मतदारसंघ , जमीन घर नोकरी हवा पाणी सर्व मुंबई नि दिलं पण तिची भाषा इतकी अस्पृश्य वाटावी कि चक्क मतदारसंघ तयार करावेत हेच दुर्दैव!
अन्य राज्यात येऊनही एका वेगळ्या भाषा संस्कृतीचा ज्ञानकोश मिळत असतानाही तो प्राशन करता न येणे हे दुर्दैव .


आजही अवघ्या भारताला मुंबई मराठी लोकांची आहे हे मान्य नाहीय पण एवढं घुसनही ती आमचीच आहे.
बेळगाव च हि तसेच गेल्या 70 वर्षांपासून बेळगाव महानगर पालिका कर्नाटकात असूनही मराठी भाषिकांच्या समिती च्या नगर सेवकांच्या हाती आहे.या 7 दशकात आमचं बेळगाव खूप विस्तारलं. अन्य भागातून लोक आलीत लाखो च्या संख्येत शिवाय कानडी सत्तेनी कन्नड लोकसंख्या वाढावी याचा पुरेपूर प्रयत्न केला Uपण तरीही बेळगाव मध्ये सत्ता आपलीच आहे.हे झालं कर्तृत्व पण बेळगाव चा खटला तब्बल 50 हुन अधिक वर्षांपासून सर्वोच्चं न्यायालयात खितपत पडून आहे आणि म्हणून  आजही ते कर्नाटकात च आहे हेच दुर्दैव.



3 दिवसाधीच लिहिलेला हा लेख अपूर्णच वाटत होता.एक काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होतं. कालच तसं घडलं.लेखाच्या पूर्णत्वाची हुरहूर हि आयुष्यभर मनाला छळणारी एक हुरहूर बनून जाईल असं वाटतं नव्हतं.
आयुष्यात लहानपणापासून असं कोणी असत कि जे आई बाबा पेक्षा जास्त जवळचं वाटतं. कारण तेवढा लाड केला जातो आपला त्या व्यक्तीकडून.जुने लोक खूप प्रेम करायचे आता नाही राहील तसं. आजवर अशी एकच व्यक्ती आयुष्यत आली जिने निस्वार्थ प्रेम केलं. मी पण खूप जीव लावला मी दूर म्हैसूर ला आणि ती आजारी नागपूरला .2 तारखेला भेटून आलेलो मी तेव्हा पण स्वास्थ्य  ठीक नव्हातंच पण 27 ला डॉक्टरांनी सांगितले फक्त 24 तास शेवटचे. मी सर्वात दूर तिचा सर्वात जास्त जीव माझ्यात पण मला कोणीही कळवलं नाही. Wstapp वर कळलं 28 ला रात्री ती गेली.खूप आटापिटा करूनही म्हैसूर ते बंगलोर व मग नागपूर अशा प्रवासाला दुपारी 4 पन्नास चं विमान मिळालं. 7 पर्यंत नागपूरात घरी आलो पण तोवर मला कवटाळणारे ते हात,जे म्हणीन ते आणि जेव्हा म्हणजे अगदी रात्री 2 वाजता पण शिरा म्हटलं तर शिरा करून देणारा तो वात्सल्याचा मूर्तिस्वरूप देह काष्ठग्नि मध्ये जळून खाक झाला होता. कायमचा मला न दिसण्यासाठी .एखादी व्यक्ती दिसूच नये कायमची असे दुःख नाही आणि त्यास शेवटचं आपल्याला बघता येऊ नये हे सर्वात मोठं दुर्दैव. दिवसाला प्रत्येक क्षणी कधी डोळ्यातून तर कधी मनातून फक्त आसवे देऊन गेली ती. माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं  दुर्दैव हेच आहे.😭


शेवटी सत्य हेच आहे की कर्तृत्ववान असायलाच हवं पण नेहमी कर्तृत्व अथवा कर्म तुमचं सुदैव अथवा यश ठरेल असं नाही. 
या दैवा या नशीबा हेच अंतिम सत्य.

No comments:

Post a Comment