स्थळ : पुणे रेल्वे स्थानक
एव्हाना गाडी यायची वेळ झाली होती. सगळे प्रवासी आपला बोगी नं स्क्रीन वर बघून त्या त्या जागी सामान घेऊन धडपड करत जात होते. रुळाच्या पलीकडे लोखंडाचा लांब पाईप होता ज्यातून रेल्वे गाडीत पाणी भरतात तो पाईप. आणि तिथेच लाल रंगाच्या फाटक्या कपड्यात ती उभी होती . पायात चप्पल सुद्धा नाही . त्या दगड गिट्टी असलेल्या रुळाच्या बाजूच्या जागेवर उभे राहावे लागणे तेही अनवाणी हे तिचे आणि तिच्यासारख्या कित्येकांचे दुर्दैव भारताला मिळालेल्या तथाकथित स्वातंत्र्याच्या 7 दशक पुरती नन्तर सुद्धा. ती चेहऱ्यावर सुरकुत्या असलेली , पंचविशीत असूनही चाळिशीकडे झुकलेली दिसत होती जणू अवेळी पडलेल्या पावसाने आमच्या विदर्भातली पराटी कापूस उद्धवस्त केली तशी. कृश आणि दरिद्री अवस्था.
तेवढ्यात गाडी आली माझा डबा एस 1 होता . 15 वी सीट साईड लोवर म्हणतात ना तीच. मी सामान घेऊन आत गेलो आणि बसलो. खिडकीतून सहज बाहेर पहिले असता ती हो तीच त्या रेल्वे मध्ये पाणी भरायच्या पाईप मधून ओंजळीने पाणी पीत होती. आपली तृष्णा भागवत होती. पण आयुष्यात असलेल्या दुर्दैवाचे काय तिला प्रश्न पडला नसेल काय? उणीव पुरुषत्वाची आणि स्त्रीत्वाचीही त्यात नशिबी आली गरिबी , जागोजागी रेल्वे मध्ये टाळ्या वाजवून पैसे मागण्याची वेळ. तरीही तीच हो ना तीच तो नाही म्हणता येत त्यांना कारण वैज्ञानिक दृष्ट्या ते एक्स झिरो फिमेल्स असतात.
अशीच पाणी पिऊन ती माझ्या डब्ब्यात चढली. आणि टाळ्या वाजवून पैसे मागू लागली. मी गाणी ऐकत बसलेलो, माझ्याकडे आली आणि इशाऱ्यात त्या केविलवाण्या चेहऱ्याने पैसे मागितले. मी क्षणाचाही उशीर न करता पाकिटातून 20 ची नोट काढून देऊन दिली. तिने डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. आणि निघून गेली.
पण मला काही वेळासाठी विचार देऊन गेली जो भावनिक दृष्टीने जन्मभर मला दुःख पर्वताएवढे याची जाणीव देत राहील. मी आपला तेच अंतकरणातल्या देवाला विचारू लागलो देवा असे का असावे रे या लोकांचे नशीब त्यांना ना पुरुष म्हणून जन्म दिला तू ना स्त्री म्हणून, तृतीय पंथी किंवा किन्नर अथवा (दुर्दैवाने हा शब्द लिहावा लागतोय) छक्का अशी शेलकी संबोधने कायमचीच त्यांच्या नशिबात. समाज बघून हसतो त्यांना. चीड उडवतो त्यांची. त्यांना कामे देत नाही. त्यांची अशी गत केलीय आपण. सृष्टीच्या सृजनाचे प्रतीक शालूका आणि लिंग यांच्या ने बनलेल्या शिवाच्या पिंडीला मानणारा समाज, अर्धनारीश्वर रुपी आदी पुरुषास भजणारा समाज या मानव रुपी देवाचा इतका तिरस्कार का करतो कोण जाणे?
मी याच विचारात होतो तर कोणीतरी डोळयांसमोर 10 रुपयाची नोट धरली मी आश्चर्याने वर पहिले तर काही निमिषांनी परत आलेली तीच होती . आणि तेही 10 रुपये परत करायला आलेली विशाल हृदयी ती. मी दिलेल्या 20 रुपयातले 10 परत करावे किती हा मर्यादा असलेला स्वभाव. स्वतः जवळ काही नसून असलेले ते आचरणातले समाधान. तो विवेक जो धर्माच्या नावाने दुकाने पक्ष फेसबुक पासून नोकऱ्या सुद्धा चालविणाऱ्या लोकांमध्ये नाहीय. तो तिचे ठायी दरिद्री नारायणी रुपात विलसतो आहे. मी 10 ची नोट परत घ्यायला नाही म्हणालो. पण ती ऐकायला तयार नव्हती. ते दहा रुपये डोक्यावर ठेवून म्हणाली ठेव जपून कामात येईल. मला घ्यावीच लागली नोट परत. नमस्कार करून पाकीटातल्या दत्त गुरूंच्या फोटो च्या कप्प्यात ठेवली ती नोट. कायम जपून ठेवेन ती आता. अतिलोभो न कर्तव्य:। हा मर्यादेचा गुरु मंत्र देऊन गेली ती. आणि मी परत दुःखाच्या डोहात एक डुबकी मारून आलो.
असो ।
No comments:
Post a Comment