अहंकाररुपी भ्रम
....
अहंकार हा आनंदापासून आपल्याला दूर ठेवणारा असा मित्र आहे, जो ज्याने त्याने आपआपल्या मेंदूत कायमचा कोरून घेतलाय. ज्याचे पाश सोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तुटता तुटत नाही. ज्यावेळी आपल्या विरोधात किंवा आपल्या मनासारखी कृती होत नाही, त्यावेळी आपला अहंकाररुपी नाग फुत्कारायला लागतो. या अहंकाराने कित्येकांचे असे बळी घेतलेत, ज्याच्या उपचारासाठी औषध सापडलं नाही आजवर.
बऱ्याच वेळा आपण स्वाभिमान आणि अहंकार यात गल्लत करतो. अहंकार हा आंधळा झालेला पण तरीही आपल्यालाच सगळं दिसतं अस म्हणत राहतो, तर स्वाभिमान म्हणजे उघडं डोळ्यांनी सत्य जाणून केलेली प्रतिज्ञा आहे. अहंकाराच्या प्रेमात पडलेल्याना दुःखरूपी भोपळा फोडायला कधीच सोप्प जात नाही कारण त्यांच्यालेखी आपलं छोटसं डबकच विश्व असत. अहंकाराला जर अज्ञानाची जोड मिळाली तर मात्र दुःख कोणतं आणि आनंद कोणता हे विचारायची गरजच उरत नाही.
अहंकार विरघळवून जगाचा प्रेमाने स्वीकार करणं ही काळाची गरज आहे, नाहीतर हा अहंकार कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे आपल्याला झुलवत ठेवतो. ज्या शेपटीला पकडण्यासाठी तो कुत्रा खुप धडपडतो पण त्याला यश मिळत नाही कारण ती त्याला कधीच पकडता येणार नाही.
आपण आपल्या विचारांना, वर्तणुकीला, चुकांना, दृष्टिकोनाला चांगल्या वाईटाचा तराजूत तोलून बघत नाही, याउलट दुस-यांच्या त्याच गोष्टी मात्र एखादया मुसळाप्रमाणे आपल्याला खुपत राहतात. यावरून आपण नेहमीच आपल्या जबाबदारीपासून दूर पळतोय अस कोणाला कधीच वाटत नाही. कारण मी जे करतोय ते 100% योग्य आहे असा आपला तर्क आपल्याला मारक तर ठरतोच पण आपल्या दुःखाच कारण बनतो.
कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात, दोन दृष्टिकोन असतात पण आपण मात्र आपल्याच चष्म्यातून जगाने जग पाहावं ही भाबडी अपेक्षा करतो. पण स्वतःच अंतरंग मात्र घासून पुसून लखलखीत करत नाही, कारण अस काही करायची शिकवण आपल्याला कोणत्याच शाळेने शिकवलेली नसते.
अहंकाररुपी हा भ्रम माणसाला दुःखांच्या खाईत नेहमीच पिचत ठेवतो जिथून वर येण्यासाठी त्या माणसालाच त्याग करावा लागतो. "मी"पणाचा. सुखांचा शोध ज्याला घ्यायचा आहे त्याने एकदा तरि डोकावून बघावं स्वतःत लपलेल्या त्या अहंकाराच्या भ्रमात ....
🙏🙏
No comments:
Post a Comment