Tuesday, 28 November 2017

गुहागर...कविता....

पाटामध्ये तीन पाट
माडबनांची नगरी
निळ्या सागराची लाट
सजे कोकण सुंदरी


दुर्गादेवीच्या पायाची
घ्यावी एकदाती धुळ
गुहागरच्या बोलीमध्ये
भरलाय तिळगुळ


नारळात नारळ घ्यावा
कधीही गुहागरी
व्याडेश्वरात पहावी
भोळी भाबडी पंढरी


तळीच्या बाजारात
भाजी घ्यावी खच्चून
हापूसवर नजर ठेवावी
आमरसाचा मान राखून



नमनात संकासुर पाह्याचा
शिमग्याचा मान त्याचा
पाठीवरचा वेट त्याचा
कधी वाया नाही जायाचा

भाजीमध्ये भाजी
ओल्या काजुगराची
चव घ्यावी सोलकढीची
दारीरास फणसाची


समिंदराची गाज
तिथं बामणघळ
दशभुजा गणेशाचे
भोळे निरमळ फळ


आनंदीच्या माहेरात
बारभाईचे चरे
गोपाळगड पाहताना
सुटलेत दाभोळचे वारे


भात नाचणीचा ढीग
म्हावर्यावर पोट
दरयामध्ये दिसतीया
तांडेलाची बोट


असा गुहागरी ठेवा
वाजे हदयात पावा
घेऊन जाण्या विसरू नये
कधी रानमेवा


रूपेरी किनार्याला
सुरूची झालर
कोणीही करावी
इथली सफर!
:

No comments:

Post a Comment