Friday 11 November 2016

सुभद्रातनयस्य वीरता


औक्षहिण अठरा जमले, संगर करण्या रणी,
शंख ध्वनी-टण्कारांनी कल्लोळ उसळला क्षणी. - १



चतुरंगाच्या सेना उत्सुक झाल्या करण्या तांडव,
नभी ग्रह-गोलांचीच टक्कर तैसे कौरव-पांडव. - २



व्युह रचुनि सुसज्ज द्रोण कौरव सेनापती,
कसा करावा भेद तयाचा कुंठीत झाली मती. - ३



कसे करावे प्रत्युत्तर ते पार्थ येथे नसता?
तोच एक भेदिल व्युह हा सहजी हसता-हसता. - ४



तोच उठला बालक जैसा मृगेंद्र-शावक वनी,
बालक कैचा? पार्थपुत्र तडतडती सौदामिनी. - ५



द्यावी आज्ञा बालक वदला नमवुनि कोवळे शीर,
रुकार मिळता विंधीत व्युह बेभान दौडला वीर. - ६



सुटु लागले तीर सरसर, नयन पापणी लवता,
वर्षाव करीतसे कोण? अर्जुन तो येथे नव्हता! - ७



कोण असा हा वीर? उत्सुक कौरव सेना अशी,
उभा सुकुमार ठाकला सुर्य-शलाका जशी. - ८



शतकर्णी ध्वज उंच तयाचा, सुमित्र सारथी,
सुवर्णांकित चिलखतासवे, ऊभा महाभारती - ९



मातेच्या गर्भात शिकले ते मनी आठवे आज,
अभिमन्यु वीर धुरंधर, धावुन वाचवी लाज. - १०









No comments:

Post a Comment